विद्यार्थी हजर; तर शिक्षक गैरहजर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pmc-1-3.jpg)
- शाळा सुरू झाल्यापासून 53 शाळांवर शिक्षकच नाही
– पालकेची दिरंगाई यंदाही कायम : इंग्रजी शाळांची अवस्था
पुणे– शाळा सुरू होण्याच्या केवळ नऊ दिवस आधी शिक्षक भरतीची जाहिरात काढल्याने यंदाही पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या 53 शाळा या आजवर शिक्षकांविनाच चालविल्या जात आहेत. दरवर्षी करार पध्दतीने होणाऱ्या शिक्षकांची नेमणूक ऐनवेळी केली जात असल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पालिकेकडून केले जात असल्याचे समोर आले आहे.
238 जागांसाठी ही शिक्षक भरती केली असून त्यावर सोमवारी आयुक्तांची सही झाली आहे. त्यामुळे बुधवारपासून हे सर्व शिक्षक शाळांवर रुजू होती. यामध्ये किती शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत हे लगेच सांगता येणार नाही.
– शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षणप्रमुख, पुणे महानगरपालिका
मराठी माध्यमातील पट दिवसेंदिवस कमी होत चालल्याने पुणे महापालिकेने पालिकेच्या प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. सध्या शहरात 53 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. त्यासाठी यंदा 238 शिक्षकांची गरज होती. ही बाब पालिकेला माहीत असल्याने पालिकेने ही प्रक्रिया साधारण महिनाभर आधी राबविणे अपेक्षित होते. मात्र यंदाही पालिकेची शिक्षक निवडीची ही दिरंगाई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी ठरली आहे.
राज्यातील सर्व सरकारी शाळा या 15 जूनला सुरू होणार हे शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार साधारण महिनाभर आधी या 238 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रातून 6 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सात दिवस अर्जदारांना अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर अर्जांची छाननी आणि अखेर त्याची निवड प्रक्रिया होईपर्यंत शाळा सुरू देखील झाल्या. त्यातच मुळातच दहा हजार पगार असल्याने गुणवत्ता असलेल्या शिक्षकांनीदेखील या पदाच्या जाहिरातीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी “विद्यार्थी हजर मात्र शिक्षक गैरहजर” अशी परिस्थिती पालिकेच्या शाळांमध्ये पहायला मिळाली. शाळा सुरू होऊन आजमितीस बारा दिवस पूर्ण झाले असून अद्यापही हे 238 शिक्षक रुजू झाले नाहीत. त्यांना अद्यापही नियुक्तीपत्रच मिळालेले नाही. गेल्या काही वर्षांपासून या शाळांबाबत कायमच दिरंगाई केली जात आहे. मागील काही वर्षांतही याची शिक्षक भरती प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यात राबविली होती. याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत ही प्रक्रिया शाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण झाली आहे.