विदर्भ, मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/monsoon-1.jpg)
मुंबई – राज्यात मान्सून दाखल झाला असून मुंबईसह प्रत्येक विभागात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर दुसरीकडे मराठवाड्यात अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. लातूर जिल्हा वगळता इतर सात जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून कोकण, मुंबईला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे पावसाची ओढ लागलेल्या पर्यटकांची पावले आता महाबळेश्वराकडे वळली आहेत. पाचगणी आणि कोयना धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे पश्चिम घाटाला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.
मान्सूनसाठी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात आज पावसाने उसंत घेतलेली आहे. तरी अधूनमधून येणाऱ्या मुसळधार सरींमुळे जिल्ह्यात पाणीपाणी झाले आहे. विशेषतः आंबोली हिल स्टेशनवर कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही झाल्या आहेत. गगनबावडा तालुक्यात एका दिवसात तब्बल 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातल्या पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांच्या पातळ्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे.
विदर्भात अजून म्हणावा तसा पाऊस दाखल झालेला नाही. नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस आहे. मात्र विदर्भातील बहुतांश जिल्हे अजून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी उत्तर महाराष्ट्राला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून पूर्व पावसाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झालेला नाही.