वातानुकूलित लोकलची भाडेवाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/ac-local.jpg)
चर्चगेट ते विरारचे तिकीटदर २०५ वरुन २२० रुपयांवर; तीन जूनपासून नवे दर लागू
गेल्या दीड वर्षांपासून पश्चिम रेल्वेमार्गावर धावत असलेल्या वातानूकुलित लोकलच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शनिवार, १ जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. मात्र, शनिवार आणि रविवार वातानुकूलित लोकलसेवा बंद असल्याने प्रत्यक्षात ३ जूनपासून प्रवाशांना एसी लोकलच्या तिकिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
भाडेदराची प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात फेररचना केली जाते. परंतु ३१ मे २०१९ पर्यंत त्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही मुदत संपल्याने अखेर भाडेवाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल. पहिली वातानुकूलित लोकल ५ डिसेंबर २०१७ रोजी बोरीवली ते चर्चगेट दरम्यान धावली. ठराविक प्रवासीवर्गाकडून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी वातानुकूलित गाडय़ा आणण्यात येणार आहे.
वातानुकूलित लोकलच्या भाडेदराची प्रत्येक वर्षी २४ एप्रिल रोजी फेररचना केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात येत होती. ३१ मे पर्यंतही कोणताही बदल करण्यात आला नाही. आता मात्र १.२ च्या पटीत असलेले भाडेदर १.३ च्या पटीत आकारले जाणार आहे. साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीच्या भाडेदरावर आकारून वातानुकूलित लोकलचे भाडेदर निश्चित केले जाते. आता या पद्धतीने नवीन भाडेदर लागू होतील.
पासही महागणार
चर्चगेट ते दादपर्यंत सध्याचा असलेला महिन्याचा पास ८२० रुपयांवरून तो आता ८८५ रुपये होईल. तर चर्चगेट ते अंधेरीचा महिन्याचा पासदर १.२४० रुपयांवरुन १,३३५ रुपये होईल आणि विरापर्यंत असलेला पास २,०४० रुपयांवरुन २,२०५ रुपये होणार आहे.