‘धर्मवीर 2’ मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची भूमिका साकारली आहे ते पाहुयात…
या चित्रपटात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक व्यक्तीरेखा पहायला आहेत मिळत
मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक व्यक्तीरेखा पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या मंत्र्यांची ‘धर्मवीर 2’मधील भूमिका हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. शंभूराज देसाई, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांना पाठिंब देणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे शंभुराज देसाई. ‘धर्मवीर 2’मध्ये त्यांची भूमिका अभिजीत थीटे यांनी साकारली आहे.
संजय शिरसाट-शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत बंड झाला तेव्हा त्यात संजय शिरसाट यांचाही समावेश होता. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. आता ते सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्त आहेत. अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी चित्रपटात शिरसाट यांची भूमिका साकारली आहे.
संदीपान भुमरे- शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे नेते गुवाहाटीला गेले होते, त्यात संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. अभिनेते उदय सबनीस यांनी चित्रपटात भुमरेंची भूमिका साकारली आहे.
शहाजी बापू पाटील- ‘धर्मवीर 2’मध्ये आनंद इंगळे हे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भूमिकेत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर सर्वाधिक चर्चा त्यांचीच झाली होती. काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओके.. अशी त्यांची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती.
भरत गोगावले- शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची भूमिका अभिनेते सुनील तावडे यांनी साकारली आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही.
अब्दुल सत्तार- अभिनेते कमलाकर सातपुते यांनी ‘धर्मवीर 2’मध्ये अब्दुल सत्तार यांची भूमिका साकारली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तार यांनी शिंदेंची साथ दिली होती. सत्तार यांना शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं आहे.