वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Arrest-LOCJ-1.jpg)
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए १९८१) मतीन यांच्यावर कारवाई केली आहे. मतीन यांची एका वर्षासाठी हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
मतीन याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, जाळपोळ करून नुकसान पोहोचविणे, मनुष्यहानी होईल असे धोकादायक कृत्य करणे, जाणीवपूर्वक नुकसान पोहोचविणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा, दोन जमातींत तेढ निर्माण करणे, असे विविध गुन्हे दाखल आहेत.
वाचा : औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण
शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.