वसईत रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्यावर अॅसिड हल्ला, पतीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/vasai-1-1.jpg)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई भागात एका दाम्पत्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी मात्र गंभीर जखमी झाली आहे. सुरूवातीला लिव्ह इन मध्ये रहाणाऱ्या या दाम्पत्याचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. वर्सोवा ब्रिजजवळ ही घटना २९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमाराला घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश विरेंद्रकुमार तिवारी आणि सीमा विश्वकर्मा तिवारी यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या अविनाश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अविनाश आणि सीमा हे दोघेही दहिसर पश्चिम भागात असलेल्या कंदारपाडा भागात असलेल्या दिशा अपार्टमेंटमध्ये रहात होते. बुधवारी हे दोघेही जेवणासाठी वसई येथील किनारा हॉटेलमध्ये गेले होते. तिथून परतत असताना रात्री दोन ते अडीचच्या सुमारास या दोघांवर अज्ञात व्यक्तीने अॅसिड हल्ला केला. वाहनांच्या रहदारीमुळे या दोघांनाही रस्ता ओलांडण्यासाठी वेळ लागत होता. त्याचवेळी एका अज्ञाताने या दोघांवर अॅसिड हल्ला केला.
अचानक धूर झाल्याने या दोघांना काहीही दिसेनासे झाले. हीच संधी साधून हल्लेखोर फरार झाला. अविनाश यांच्या तोंडात, नाकात, डोळ्यात अॅसिड गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वालीव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.