लोकमान्य टिळकांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Lokmanya-Tilak1-272x182.jpg)
टिळकांचे अपरिचित साहित्य प्रकाशझोतात येणार
पुणे- लोकमान्य टिळकांचे अपरिचित साहित्य लोकांसमोर आणण्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट व केसरी-मराठा ट्रस्टने काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले आहेत. लोकमान्यांच्या प्रकाशित-अप्रकाशित समग्र साहित्याचे पुनर्मुद्रण करण्याचा मोठा प्रकल्प या संस्थांनी सुरू केला आहे. सरकार व्यवस्था, राजकीय पक्ष, भारतीय पत्रकारिता आणि सामान्य नागरिकांना आजही लागू पडेल, अशा साहित्यावर यानिमित्ताने पुन्हा प्रकाश टाकला जाणार आहे. दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी टिळकांची 100 वी पुण्यतिथी आहे. त्यनिमित्ताने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे दीपक टिळक यांनी सांगितले. लोकमान्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयी डॉ. टिळक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
“लोकमान्यांची 100 वी पुण्यतिथी आहे. त्यनिमित्ताने लोकमान्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. यात लोकमान्यांचे चरित्र, काव्यसंग्रह, अग्रलेख, प्रकाशित व अप्रकाशित लेखन असे साहित्य पुन्हा प्रसिद्ध केले जाणार आहे. तसेच साहित्याचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. लोकमान्यांचे विचार देशभर पोहोचावेत; म्हणून काही साहित्य हिंदी भाषेत करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या पिढीला त्यांचे विचार कळावेत, यासाठी सोशल मीडिया व आधुनिक माध्यमांचा वापर केला जाईल. दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांची 98 वी पुण्यतिथी असून, यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या “लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ हे लोकमान्य टिळकांच्या खटल्याच्या वृत्तांताचे आणि “लोकमान्य टिळक आणि प्रसार माध्यमे’ हे वृत्तपत्र, रंगभूमी, कीर्तने, मेळे, व्याख्याने, चित्रकला यांचा टिळकांनी युगप्रवर्तनाकरिता कसा उपयोग केला, याबाबतच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. लोकमान्यांविषयीचे साहित्य पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने समोर आणले जाणार आहे.