राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही, काँग्रेसचा विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/raj-sharad1.jpg)
मुंबई –निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे युती-आघाडीसाठी सर्वच पक्षाने आपापली मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण काँग्रेसने याला विरोध दर्शवला असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली आहे. महाआघाडीमध्ये मनसेचा समावेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे, पण या प्रस्तावाला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे, अशी माहिती देत मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपमांनी स्पष्ट केलंय.
काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आली नाही. मात्र, राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याने त्यांची सहमती असल्याचे प्रथमदर्शन दिसून येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.
मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचं पालन करत नाही, हिंसेचं राजकारण करतात. २०१४ च्या निवडणूकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, भाजपाचे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत, असंही निरुपम म्हणाले. मनसेकडे मतं आहेत, का, असतील तर ते त्यांना लाभो, असं म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही, असं निरुपमांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावाचा महाआघाडीवर परिणाम होऊ नये, अशी आशा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे कळवलं असल्याचं निरुपम म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या जवळीकतेमुळे मनसे-राष्ट्रवादीमध्ये काहीतरी शिजतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता राष्ट्रवादीकडून महाआघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव सादर केल्यामुळे ही चर्चा खरी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय निरूपम यांनी जरी आपले मत मांडले असले तरी याबाबत अद्याप राज ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादी मनसे राज्यात एकत्र लढणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.