राज्यात २४ तासांत ३ हजार ६४५ नवे कोरोना रुग्ण
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
- मुंबईत ८०४, पुण्यात ५७६ रुग्ण
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या नव्या संख्येत ५ ते ८ हजारांची वाढ होत होती. आजची आकडेवारी फार दिलासादायक असून गेल्या २४ तासांत ३ हजार ६४५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, केवळ ८४ मृतांची नोंद झाली आहे. तसेच, ९ हजार ९०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण देशात सापडला. त्यानंतर देशात नियमित कोरोना रुग्णांवर वाढ होत होती. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असल्याने महाराष्ट्रातील चिंता वाढत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण कमी संख्येने वाढताना दिसत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोमवारी ५ हजार नवे रुग्ण सापडले होते. आजच्या सोमवारी हीच आकडेवारी ३ हजार ६४५ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात ही आकडेवारी कमी कमी होत जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे १६ लाख ४८ हजार ६६५ एकूण रुग्ण झाले आहेत. तर यामध्ये १४ लाख ७० हजार ६६० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३ हजार ३४८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ३४ हजार १३७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.