राज्यातील मंदिरे येत्या आठ-दहा दिवसांत खुली होणार, मुख्यमंत्र्यांचे आंबेडकरांना आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Untitled-2-1.png)
पंढरपूर – जनभावना लक्षात घेता मंदिरे, मशी, बुद्धविहार, जैन मंदिरे लवकरात लवकर सुरू केली जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून ही नियमावली आठ-दहां दिवसात तयार होईल असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सोलापुरातील विठ्ठल मंदिरात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाज्यातून विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.
आंबेडकर पुढे म्हणाले की, मी दर्शन घेतलं. 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण समजुया, असं आंबेडकर म्हणाले. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असंही ते म्हणाले.
…पुन्हा लढायला लावू नका
10 दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार असं देखील आंबेडकर म्हणाले. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं आहोत, पुन्हा या प्रश्नांवर आम्हाला लढायला लावू नका असंही ते म्हणाले. इथले जिल्हाधिकारी, पोलिस कार्यालय यांनी जी भूमिका घेतली त्याबाबद्दल मी जाहीर अभिनंदन करतो. आपलं आंदोलन या ठिकाणी थांबवतोय. ज्या शांतपणे आपण सहकार्य केले, त्याच पद्धतीने तुम्ही गावाला जा. 10 दिवसांनंतर पुन्हा यावं लागलं तर तयारी ठेवा, असंही ते म्हणाले.