राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,90,759 वर
![The number of corona sufferers in the country is 1,05,95,660](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-6.jpg)
- मुंबईत 531, पुण्यात 396 नवे रुग्ण
मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे रविवारी आढळलेल्या 3,081 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,90,759 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 2,342 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 50 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 18,86,469 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,438 वर पोहोचला आहे. तर सध्या 52,653 रुग्ण उपचार घेत आहेत.
वाचा :-राज्यातील १२,७११ ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 531 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,02,753 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,242 इतका झाला आहे. तसेच सध्या मुंबईत 6,772 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 396 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,72,916 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,954 इतका आहे. दरम्यान, काल आढळल्या 396 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 273, पिंपरी-चिंचवडमधील 123 रुग्णांचा समावेश आहे.