राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,76,699 वर
![The number of corona victims in the state is 25,64,881](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1800x1200_coronavirus_1.jpg)
- मुंबईत 680, पुण्यात 761 नवे रुग्ण
मुंबई – शनिवारी दिवसभरात आढळलेल्या 4,259 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,76,699 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,949 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 80 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,53,922 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,139 वर पोहोचला आहे. तर सध्या 73,542 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 680 नवे रुग्ण आढळले, तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,90,023 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,969 इतका झाला आहे. तसेच काल 478 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,65,760 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 12,464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 761 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,51,584 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,612 इतका झाला आहे. तसेच काल 781 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,33,759 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 761 रुग्णांमध्ये 317 रुग्ण हे पुणे शहरातील असून 180 रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि 201 रुग्ण ग्रामीण भागातील व 63 रुग्ण कंटेनमेंट झोनमधील आहेत.