रस्त्यांसाठी ‘कोल्डमिक्स’ नको
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Untitled-5-62.jpg)
स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला आदेश
मुंबईच्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी तसेच खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोल्डमिक्सचा अस्फाल्ट प्लांट हा मागील तीन महिन्यांपासून बंद असून त्यामुळे रस्ते विकासाची कामे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना संपूनही सुरू झालेली नाहीत. कोल्डमिक्सचे हे तंत्र पावसाळ्यातच फसल्याचा आरोप करीत हे तंत्र यापुढे न वापरता बंद करण्यात यावे आणि पर्यायी तंत्राचा वापर करण्यात यावा, असे आदेश गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी प्रशासनाला दिले.
मुंबईच्या रस्त्यांसाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्सचे उत्पादन तीन महिन्यांपासून बंद असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी हरकतीच्या मुद्दय़ावरे बुधवारी स्थायी समितीत सांगितले. पाऊस संपल्यानंतरही रस्त्यांच्या तसेच खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झालेली नाही. अधिकारी मात्र अस्फाल्ट प्लांट बंद असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कोणालाही सध्या कोल्डमिक्सचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे कोल्डमिक्सची काय स्थिती आहे, याची माहिती दिली जावी अशी मागणी त्यांनी केली.
कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान बनवण्यासाठी महापालिका १२५ कोटी रुपये खर्च करत आहे. परंतु पावसाळ्यात या कोल्डमिक्सचा वापर केवळ २२५ टन एवढाच झाला होता. त्या तुलनेत हॉटमिक्स तंत्रज्ञानाचा वापर २२०० टन एवढा करण्यात आला. त्यामुळे कोल्डमिक्सऐवजी हॉटमिक्सचाच वापर होत असल्याने हे कोल्डमिक्स बंद करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. कोल्डमिक्स हे तंत्र २७ रुपयांमध्ये उत्पादित करण्यात येत असल्याचे सांगत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठ थोपटवून घेतली. परंतु हे तंत्रच दर्जाहीन असून ते त्वरित बंद करायला हवे, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. हा कुणाचे खिसे भरण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल त्यांनी केला. कोल्डमिक्स प्लांट बंद करावे, अशी मागणी सपाच्या रईस शेख यांनीही केली.
१२० टनांचा साठा
प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्डमिक्सचा सुमारे १२० टनांचा साठा असल्याचे सांगितले. तसेच त्याचा वापर कशा प्रकारे करता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. परंतु यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांच्या भावनेचा विचार करता कोल्डमिक्सऐवजी पर्यायी तंत्राचा वापर केला जावा, अशी सूचना त्यांनी केली.