येत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sky-paus.jpg)
पुणे : हवामान अनुकूल असल्यामुळे मान्सून येत्या तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात शुक्रवारी दाखल झालेला मान्सून येत्या २४ तासांत अंदमान-निकोबारच्या सर्व बेटांवर; तसेच दक्षिण अरबी समुद्रात दाखल होईल. त्यापुढील ४८ तासांत लक्षद्वीप, केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचेल असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
अंदमान-निकोबारमध्ये २३ मे, तर केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने दिला होता. या अंदाजाला अनुसरून मान्सूनची प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या मान्सून हंगामातील पहिले कमी दाबाचे क्षेत्र २८ मे रोजी मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता असून, या क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सूनचा बंगालच्या उपसागरात प्रवेश होणार आहे. दुसरीकडे केरळच्या किनारपट्टीजवळ जमिनीपासून दोन किलोमीटर उंचीपर्यंत हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे केरळच्या दक्षिण भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
‘आयएमडी’च्या पुढील आठवड्याच्या पावसाच्या अंदाजानुसार ३० मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून, दोन ते पाच जून दरम्यान राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.