‘यूपीएससी’त शेतकऱ्याचा मुलगा देशात ३०४ वा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/upsc-1.jpg)
पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राचा आलेख उंचावला आहे. यूपीएससी परीक्षेत राज्यातून यश मिळवलेल्या उमेदवारांमध्ये यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ९० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले होते. यंदा हा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता आहे.
यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. उस्मानाबादमधील गिरीश बडोले याने देशात २०वा क्रमांक पटकावला आहे. देशभरातून पहिला येण्याचा मान हैदराबाद येथील अनुदीप दुरीशेट्टी याने मिळविला आहे. त्या खालोखाल अनु कुमारी आणि सचिन गुप्ता यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे यूपीएससीत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण वाढले आहे. गिरीश बडोले हा राज्यातून पहिला आला आहे. त्याच्या खालोखाल दिग्विजय बोडके याने केंद्रीय पातळीवरील या पात्रता परीक्षेत ५४वा आला आहे. सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पीयूष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयूर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९), रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतीक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६), या परीक्षार्थींनीही यूपीएससीत यश मिळवले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परदेशी सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ आणि ‘ब’ करिता ही परीक्षा झाली होती. एकूण परीक्षार्थीपैकी ९९० उमेदवार नियुक्तीकरिता पात्र ठरले आहेत, तर १३२ उमेदवार प्रतीक्षा यादीवर असतील. एकूण जागांच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रातील उमेदवार (शंभरहून अधिक) असावेत, असे सांगितले जाते. पहिल्या शंभरमधील उमेदवारांची संख्या गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत वाढली. २०१५-२०१७ या तीनही वर्षी साधारण पाच उमेदवार शंभरमध्ये होते. यंदा ते प्रमाण ९ ते १० पर्यंत पोहोचले आहे. राज्यातील बहुतांश उमेदवार अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून राज्यातील मुलींचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण घटले असून वयाने कमी असलेले उमेदवार अधिक आहेत. पुन्हा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपेक्षा, नव्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. सातारा जिल्ह्यातील जगदीश जगताप हा देशात ३०४ वा आला आहे. जगदीश हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने दंतवैद्यक विषयात पदवी संपादन केली आहे.
नागपूरचे तीन जण यशस्वी – यूपीएससीत नागपुरमधील आशीष येरेकर, निखिल दुबे आणि नीलेश तांबे या तिघांनी बाजी मारली आहे. आशीषचा देशपातळीवरील क्रमांक ४५६ आहे, तर नीलेश तांबे या विद्यार्थ्यांचा ७३३ वा क्रमांक आहे. निखिलला ९२६वा क्रमांक प्राप्त झाला आहे.