युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे तुटणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर
अमरावती – ही युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड होणार, तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ही युती केवळ सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची आहे. होय आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रसाठी, ज्याला देशावर प्रेम आहे, ते आमचं हिंदुत्व आहे असंही ते यावेळी म्हणाले.
सत्तेकरता युती झालेली नाही असं सांगताना भविष्यात युती अशीच टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती झाल्यानंतर काहीजणांनी माघार घेतली असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचं नाही असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितलं.