मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी – गृहमंत्री अनिल देशमुख
!["ED has got all the evidence, Anil Deshmukh will be arrested soon"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/anil-deshmukh-1-scaled.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
गृहमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे आहे :
१. कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
६. कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.