मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/sharad-pawar8.jpg)
- शरद पवार यांचा आरोप
नगर – मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही, त्यांना दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती नाही, रोहयोचीही माहिती नाही, राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत दुष्काळामुळे दोन महिन्यानंतर भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यात नगरचाही समावेश आहे, राज्याच्या प्रमुखालाच गांभीर्य नसल्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज केली.
आज सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पक्षकार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. दिलीप वळसे, आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
यावेळी खा. शरद पवार यांनी राज्य सरकार दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांचा वाढता कर्जबाजारीपणा याकडे लक्ष देत नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याविरुद्ध सरकारविरुद्ध संघर्ष करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होतील याचा सध्या अंदाज नाही, परंतु पेब्रुवारीनंतर कधीही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारीसाठी केवळ ३ महिन्यांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे आपल्यावर अधिक जबाबदारी आहे, लोकांमध्ये सरकारविरुद्ध अस्वस्थता आहे, लोक सरकारविरुद्ध एकत्र येण्यास तयार आहेत, ८१ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे सरकार सांगते मात्र ती कोणाला मिळाली हे सांगता येत नाही, हा पैसा काही बँकाच्या माध्यमातून उद्योगांचे थकित कर्ज माफ करण्यासाठी वापरला गेला. अनेक राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना किंमत देत नाहीत, त्यांना दारात उभे करत नाहीत, पंतप्रधान केवळ ‘मन की बात’ करतात, परंतु त्यांना ‘जन की बात’ माहिती नाही, भाजपला आता लोक कंटाळले आहेत, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध संघर्ष करत प्रश्न सोडवावे व जागृती घडवावी, असेही आवाहन त्यांनी केले.
नगर दक्षिणच्या जागा वाटपाविषयी पक्षातूनच होत असलेल्या वक्तव्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आपसातील मतभेद बाजूला ठेवा, परस्पर जागा वाटप करु नका, जागा वाटप करण्याचा अधिकार केवळ शरद पवार यांना आहे, तो इतर कोणालाही नाही, पक्षात लोकशाही असलीतरी त्याबद्दल जाहीर वाच्यता कोणी करु नये, घरात बसून पारनेरसारखी पक्षाची लक्तरे कोणी टांगू नये, असे पाटील म्हणाले.
एका विचाराने न राहिल्याने जिल्हा भाजपकडे
नगर जिल्हा कधीच भाजपचा म्हणून ओळखला जात नव्हता, हा जिल्हा पूर्वी प्रागतिक व डाव्या विचारांचा म्हणून ओळखला जायचा, नंतर काँग्रेस व आपला होता, परंतु जिल्ह्य़ाचे हे चित्र आता बदलले आहे, भाजपला ५ जागा मिळाल्या. याचा अर्थ भाजपचा विचार लोकांनी स्वीकारला आहे, असे नाही तर जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी एक विचारांनी राहिली नाही, जिल्ह्य़ात भाजप लोकांपर्यंत पोहचलेला नाही तर आपणच कमी पडलो आहोत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला आहे.