मुंबईत कोरोना टेस्टची संख्या वाढवा – ICMR
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/coronavirus-1-2.jpg)
मुंबई | राज्य सरकारकडून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत असले तरी आता भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने ICMR शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा, असे निर्देश दिले आहेत. मुंबईत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. रुग्णांची संख्या जास्त दिसू नये म्हणून राज्य सरकार जाणीवपूर्वक कमी चाचण्या करते, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ICMRकडून देण्यात आलेले निर्देश महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
सध्याच्या घडीला मुंबईत दिवसाला फक्त ५५७९ कोरोना चाचण्या होतात. याउलट दिल्लीत दरदिवशी जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यामुळे सध्या दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मुंबईच्या तुलनेत दिल्लीचा मृत्यूदर कमी आहे. दिल्लीचा मृत्यूदर ६.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आला. तर सुरुवातीच्या काळात जवळपास ८ टक्क्यांवर असलेला मुंबईचा मृत्यूदर चार ते सहा टक्क्यांपर्यंतच खाली उतरला आहे. राज्याच्यादृष्टीने ही चिंतेची बाब मानली जात आहे.
त्यामुळेच ICMR ने मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिल्याचा अंदाज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यास रुग्णांचे प्रमाण काही दिवस वाढेल. पण नंतर दिल्लीप्रमाणे हळुहळू रुग्णांची संख्या कमीदेखील होईल. तसेच मृत्यूदरही कमी होईल, असे ICMR चे म्हणणे आहे. १ ते २२ जुलै या कालावधीत मुंबईत १,२२,७५९ कोरोना चाचण्या झाल्या. तर दिल्लीत याच काळात ३,१९,५५९ कोरोना टेस्ट करण्यात आल्या.