मुंबईतील दादर चौपाटीवर ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/mumb.jpg)
मुंबई : दादर चौपाटी येथे आज सकाळी अकराच्या सुमारास माहीममधील तीन शाळकरी मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हे तिघेही माहीमच्या उनल मिल हायस्कूलचे विद्यार्थी होते.
भरत हनुमंत (वय- १३ वर्षे), अनुप यादव (वय – १६ वर्षे) आणि रोहित यादव (वय- १५ वर्षे) अशी या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील रोहित आणि अनुप हे दोघे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात आले.
दादर चौपाटी येथे तीन मुले समुद्रात बुडत आहेत, असा कॉल अग्निशमन दलाला साडेअकराच्या सुमारास आला. त्यानंतर तातडीने घटनास्थळी जात अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या तिनही मुलांना बाहेर काढले. त्यातील पहिल्या मुलाला भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉ. वीरेंद्र यांनी हा मुलगा मृत असल्याचे घोषित केले. तर अन्य दोन मुलेही मृत असल्याचे १०८ अॅम्ब्युलन्स सेवेचे डॉक्टर राठोड यांनी सांगितले.