breaking-newsमहाराष्ट्र

मी महाराष्ट्राची ऋणी!

  • पाठिंब्यामुळे नयनतारा सहगल भावनावश

मुंबई – माझे निमंत्रण मागे घेतल्याबद्दल नागरिक आणि साहित्यिकांनी निषेध केला. मला पाठिंबा देणारे असंख्य दूरध्वनी आणि मेल आले. माझ्या न झालेल्या भाषणाच्या अभिवाचनाचे कार्यक्रम केले गेले. या पाठिंब्यामुळे मी भावनावश झाले आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी दाखवलेल्या निर्धाराबद्दल मी महाराष्ट्राची ऋणी आहे, अशी कृतज्ञता साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांनी व्यक्त केली आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. या कृतीचे पडसाद राज्यभर उमटले. निषेध करण्यात आला. अनेक निमंत्रितांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. संमेलनस्थळीही निषेध व्यक्त झाला. सहगल यांच्या भाषणाचे अनेक ठिकाणी जाहीर अभिवाचन करण्यात आले. या पाठिंब्यामुळे भारावून गेलेल्या सहगल यांनी महाराष्ट्राला उद्देशून लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.

सहगल पत्रात म्हणतात, ‘‘मला मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले, तेव्हा मराठी साहित्यिकांशी बोलण्याची संधी मिळेल म्हणून आणि मी अर्धी महाराष्ट्रीयन असल्यामुळे, मी ते आनंदाने स्वीकारले होते. मराठी ही माझ्या वडिलांची मातृभाषा होती आणि महाराष्ट्र हे त्यांचे घर होते. मराठी साहित्यरसिकांपर्यंत माझ्या भावना पोहोचाव्यात म्हणून माझे इंग्रजीतले भाषण भाषांतरासाठी पाठवले होते. दुर्दैवाने मला दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले आणि मला संवादाची संधी मिळाली नाही.’’

सहगल यांनी या पत्रात नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचेही आभार मानले आहेत. त्या म्हणतात, ‘‘माझे निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करणारे महाराष्ट्राचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, त्याचबरोबर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचेही मी आभार मानू इच्छिते. अशी परिस्थिती पुन्हा कधी उद्भवणार नाही, अशी प्रामाणिक आशा व्यक्त करते.’’

मला आलेले असंख्य दूरध्वनी, मेल आणि बातम्यांमधून, माझे निमंत्रण परत घेतल्यामुळे सामान्य नागरिक आणि साहित्यिकांनी केलेल्या निषेधाची माहिती मिळाली. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांनी माझ्या न झालेल्या भाषणाच्या अभिवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले, याबद्दलही मला कळले. महाराष्ट्रातून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे मी भावनावश झाले आहे. मी महाराष्ट्राची मन:पूर्वक ऋणी आहे. महाराष्ट्रातील माझ्या सहकारी साहित्यिकांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्या लेखनासाठी त्यांना नवी सृजनऊर्जा मिळो, अशी शुभेच्छा देते, असेही सहगल यांनी पत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button