मी देशाला शब्द देतो, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Modi.jpg)
नवी दिल्ली – मी देशाला शब्द देतो, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा नक्कीच मिळेल, जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावीच लागेल. पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले
प्रत्येक भारतीय नागरिक जवानांच्या सोबत आहे. संपूर्ण देश एकजूट होऊन या आव्हानाचा सामना करत आहे. ही वेळ आमच्यासाठी संवेदनशील आहे. मात्र प्रत्येक हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलं. दहशतवादी संघटना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असं मोदी म्हणाले. जे जवान शहीद झाले आहेत, त्यांना मी वंदन करतो. आमच्या सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हाला त्यांच्या शौर्यावर विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.
“मी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहतो. या जवानांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. दु:खाच्या या प्रसंगी संपूर्ण देश या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. या हल्ल्यामुळे देशात जो आक्रोश आहे, जनतेचं रक्त खवळत आहे, मी ते समजू शकतो. या क्षणी देशातील जनतेची बदल्याची भावना आहे, ती स्वाभाविक आहे. आमच्या सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हाला आमच्या सैनिकांच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1096280481996386304
दहशतवादी संघटना आणि त्यांच्या आकांना मी सांगू इच्छितो, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, असा इशारा मोदींनी दिला. मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की या हल्ल्यामागे ज्या कोणी शक्ती आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा मिळणारच, असं मोदी म्हणाले.
ही सर्वात संवेदनशील आणि भावनिक वेळ आहे, त्यामुळे राजकारण विसरुन एकत्र या, असं आवाहन मोदींनी केलं. सध्या देश एकजूट होऊन या परिस्थितीचा सामना करत आहे, हा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला हवा, असं मोदी म्हणाले.
संपूर्ण जगात एकाकी पडलेला आमचा शेजारील देश अशी घृणास्पद कृत्ये करुन, भारतात अस्थिरता निर्माण करु पाहात असेल, तर ते खूप मोठी चूक करत आहेत, असा सज्जड दम मोदींनी दिला.