माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील आग्रही
पुणे ( महा ई न्यूज ) – नरेंद्र मोदीच्या लाटेतसुध्दा माढा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे इच्छुक आहेत. पण, आता माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकराव साळुंखे-पाटील यांनीही उडी घेतल्याने उमेदवारीसाठी चांगलाच तिढा निर्माण झाला आहे.
माढा हा राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. माण, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या विधानसभा मतदारसंघांत समावेश होतो. २००९ साली शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. २०१४ साली मोदी लाटेत अटीतटीच्या लढतीत येथून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. देशमुख यांच्यामागे मोहिते–पाटील यांच्या विरोधकांची खेळी आहे का, यादृष्टीनेही पाहिले जात आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी केली जात असून यानिमित्ताने पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे काहींनी पवारांच्या कानावर घातले आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. तर, मोहिते – पाटील यांचे पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता तेच उमेदवारीचे दावेदार होऊ शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. या तिढय़ात पवार विद्यमानांना पसंती देणार की भाकरी फिरवणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
दरम्यान,शरद पवार माढ्याचे खासदार असताना त्यांचा चक्रधारी (गाडीचा चालक) म्हणून प्रवास केला आहे, तसंच मला या मतदारसंघाची खडानंखडा माहिती आहे. त्यामुळे माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं, असं माजी आमदार दिपकराव साळुंखे-पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांचा संपर्कप्रमुख असताना मी गाव ना गाव फिरलो आहे. त्यामुळे या मतदारसंघाची माहिती असलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले.