माझे नाव संघाशी जोडण्या-यांवर खटले दाखल करणार : अण्णा हजारे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/anna.jpg)
अहमदनगर : सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे, अशा संत पंक्तींचा हवाला देत समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.
यात अण्णा म्हणतात, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांची नात असल्याच्या व त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक त्यांचा व माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलनासाठी विविध राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपविलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आंदोलनाची कामे विभागून घेतली. त्यानुसार इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणा-या चौकडीला भानच राहिलेले नाही.