‘महाशिवआघाडी’ होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करतंय: पृथ्वीराज चव्हाण
![Central government should stop all flights to United Kingdom: Prithviraj Chavan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/prithviraj-chauhan_3780632_835x547-m.jpg)
मुंबई : सत्तास्थापनेची खलबतं सुरु असताना एकमेकांवर आरोपांच्या फैरी देखील झडू लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप आमची आघाडी जुळू नये म्हणून प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापुढे महाशिवाघाडीत कशा पद्धतीने चर्चा होणार हे देखील स्पष्ट केले.
चव्हाण म्हणाले की, शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला तेव्हा सोनिया गांधींनी याबाबत व्यापक चर्चा केली. मात्र जोपर्यंत शिवसेना एनडीएचा घटक होता तोपर्यंत चर्चा करणे शक्य नव्हते. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली. आम्ही आमदारांशी चर्चा केली आणि ते सोनिया गांधींना कळवलं. सोनिया गांधींनी त्यानंतर आम्हाला दिल्लीत बोलवलं आणि चर्चा केली, असेही ते म्हणाले. दिल्लीमध्ये आम्ही आमची मतं मांडली. सोनिया गांधींनी फोनवरही चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, शरद पवारांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत औपचारिक चर्चा केली. पण पाठिंब्याचं पत्र द्यायला तोपर्यंत उशीर झाला होता. पवारांनीही म्हटलं की आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ. पवारांनी सोनिया गांधी यांना हा सल्ला दिला. त्यानंतर आम्हीही ठरवलं पुढे कसं जायचं ते चर्चा करून ठरवू. अन्यथा सरकारमध्ये जाऊन नंतर चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा ढिसाळपणा, वेळ काढला अशी टीका योग्य नव्हती, असे चव्हाण म्हणाले.