महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी ही माझी इच्छा – देवेंद्र फडणवीस
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
मुंबई – “महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असं सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे,’ असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते शिवसेनेतून भाजपात गेलेले बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते.
गेल्या दोन वर्षांत चार वेळा पक्षबदल केलेल्या बाळासाहेब सानप यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी कमळ हाती घेतलं. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने, भाजपाकडून शिवसेनेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले की, “सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण, एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल. परंतु, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोकं मावतील? हे देखील एक महत्वाचं असतं. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणं कठीण जातं, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातली सर्वात मोठी जागा जी आहे ती भाजपासाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजपा ती जागा व्यापल्या शिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडंतिकडं झालं तरी चिंता करण्याची गरज नाही.”
तसेच, “आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. दुर्देवाने त्यांनी उठवलेल्या वावड्या माध्यमांमधीलही काहीजण पुढे करतात. मात्र, चिंता करायची गरज नाही भाजपाचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, विविध पक्षांमधून जे भाजपात आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना हे समजतं आहे.” असं देखील फडणवीस यांनी बोलून दाखवलं.