महाराष्ट्रातील जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1585205188.jpg)
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊनच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये आता महाराष्ट्रातील जनतेला धान्याऐवजी थेट पीठ कसे मिळेल याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरु असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यातील जनतेसाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, संपूर्ण लॉकडाऊनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. तसंच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नका अशा सूचना आम्ही राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.