‘महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाही’- उदय सामंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-15.jpg)
विद्यापीठाच्या अंतिम वर्षासह अन्य परिक्षांबाबत मंत्रिमंडळाची बैठक बसवण्यात आली होती. राज्यातील 13 कुलगुरुंशी बोलल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी 17 मे रोजी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. सप्टेंबर मध्ये परिक्षा होऊ शकतात अस त्यावेळेस सांगण्यात आलं होत.मात्र आता फक्त सप्टेंबरच नाही तर नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नसल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे .म्हणूनच कुलगुरुंनीच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याचं सांगितले आहे. यामुळे यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत संभ्रम आहे. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नसल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.
तसेच कटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, जे विद्यार्थी गावी गेले आहेत, त्यांची परीक्षा कशी घ्यायची, या उत्तरपत्रिका कोण हाताळणार, असे अनेक प्रश्न आहेत. एटीकेटीबाबत सर्व 13 कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. १८ जूनला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक झाली, यावेळी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं, असेही सामंत म्हणाले.
एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणानुसार पास करावे, अशी 13 कुलगुरुंची शिफारस होती. तो पास होत नसल्यास त्याला कोव्हिडच्या परिस्थितीमुळे ग्रेस गुण पद्धत अवलंबावी आणि त्याची एटीकेटी सोडवावी हा देखील मार्ग काढण्यात आला होता. तसेच सरासरी गुण दिल्याने टक्के कमी मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी कोरोना गेल्यानंतर परीक्षेची पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती सामंत यांनी दिली.