मराठा आरक्षण: आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन
![Maratha reservation: All party meeting organized today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Maratha-morcha.jpg)
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नसून सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विनायक मेटे यांनी आज राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. 3 पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
मराठा समाजातील नेते एकत्र येत नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: बोलले. त्यामुळे कुणाचं किती ऐकायचं हे ठरवा, असं आवाहन मेटे यांनी केलं आहे. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं तर चांगलं होईल, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं, असा आरोपही मेटे यांनी केलाय. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.