मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
![A delegation of MPs will meet the Prime Minister for Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Maratha-Morcha.jpg)
नवी दिल्ली – मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (१२ जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यावर एकमत झालं आहे. येत्या २५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे.
वाचा :-राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र रक्षक’ सज्ज
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर आदी नेते दिल्लीत आले आहेत. या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती दिली. तसेच कायदेशीरबाबींवर चर्चा केली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नेण्याबाबत चर्चाही केली. हे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यास पवारांनी होकार दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं आहे.