मध्यभागात डॉक्टरांच्या वेशात दुचाकी चोरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/two-wheeler.jpg)
२६ दुचाकींसह मोटारी, टेम्पो मिळून ३० वाहने जप्त
पुणे : शहराच्या मध्यभागातून दुचाकी लांबविण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली होती. शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरटय़ाला फरासखाना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २६ दुचाकी, ३ मोटारी, १ टेम्पो अशी ३० वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहन चोरीचे गुन्हे करताना संशय येऊ नये म्हणून चोरटा डॉक्टरांसारखा वेश परिधान करत होता, असे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी शाहरुख रज्जाक पठाण (वय २२,रा. उदाची वाडी, वनपुरी, ता. पुरंदर) याला अटक करण्यात आली. शहराच्या मध्यभागात मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात.
मध्यभागात वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे बरेच चालक जागा मिळेल तेथे दुचाकी लावतात. गेल्या काही दिवसांपासून मध्यभागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. फरासखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस नाईक शंकर कुंभार यांनी ज्या भागातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत, अशा भागांवर लक्ष ठेवले होते. पठाणने मध्यभागातून दुचाकी चोरल्याची माहिती कुंभार यांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.
चौकशीत त्याने शहराचा मध्यभाग, डेक्कन, वानवडी, हडपसर, वाकड, कोथरुड, बंडगार्डन,लष्कर, दिघी, पिंपरी, चिंचवड तसेच कल्याण, दौंड परिसरातून वाहने लांबविल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या भागातून २६ दुचाकी, ३ मोटारी, १ टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत २७ लाख २५ हजार रुपये आहे. सहायक आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नावंदे, संभाजी शिर्के, महेंद्र पाटील, बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, अमोल सरडे आदींनी ही कारवाई केली.
चोरीची वाहने विकत घेणाऱ्यांना नोटिसा पठाणकडून दुचाकी, मोटार, टेम्पो अशा ३० वाहनांची विक्री करण्यात आली आहे. ज्यांनी ही वाहने विकत घेतली आहेत, त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिक वाहन खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत. ग्रामीण भागात चोरीच्या वाहनांची स्वस्तात विक्री केली जाते.
डॉक्टरांसारखा वेश आणि वैद्यकीय साहित्य
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पठाण मोटारीतून पुण्यात यायचा. तो डॉक्टरांसारखा वेश (अॅप्रन) परिधान करायचा. त्यावर रुग्णालयाचे नाव होते. मोटार काही अंतरावर लावून तो मध्यभागात यायचा. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत वैद्यकीय साहित्य असायचे. दुचाकी चोरताना संशय येऊ नये तसेच पकडले गेले तर सहज निसटता यावे, यासाठी तो डॉक्टरांसारखा वेश परिधान करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.