भारत बंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा- शिवसेना खासदार संजय राऊत
![Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/raut.jpg)
मुंबई: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जनतेला केले आहे. तसंच, हे काही राजकीय आंदोलन नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना उद्याच्या भारत बंदबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
‘भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिल्याचे काल आम्ही जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळ्या प्रकारचा आहे. जो शेतकरी आहे, तो संकट काळात राबत असतो, अस्मानी संकट असो सर्व संकटांशी शेतकरी सामना करत आहे. लॉकडाउनमध्ये सगळे घरी बसलेले असताता त्याने आपल्याला साथ दिली, शेतकऱ्यांनी आज आपल्याला साद दिली आहे. त्याला आपली गरज आपण त्याला साथ द्यायला हवी.
जनतेनं स्वच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे हा बळीराजांना खरा पाठिंबा ठरेल’ असं आवाहन राऊत यांनी केले आहे. ‘हा काही राजकीय बंद नाही, एखाद्या राज्याने आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बंद पुकारला नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद आहे. दिल्लीच्या सीमेवर 12 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर थंडीत बसला आहे. त्यामुळे सर्वांनी या परिस्थिती शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे’ असंही राऊत म्हणालेले आहेत.