भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर शासकीय आदेशाचे पालन न केल्याने गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/tushar-bhosale.jpg)
उस्मानाबाद: ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेलं आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
शासकीय आदेशाचे पालन न करणे, कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणे या भादंवि कलम 188, 269, 270 नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे प्रशासन व भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती. तरीही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेल्याचा आरोप तुषार भोसले यांनी केलेला आहे.