भव्य नेपथ्यातून जुन्या नाटकांना संजीवनी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Untitled-4-34.jpg)
मराठी रंगभूमीवरील ‘यशाचे प्रयोग’; ‘टिळक आणि आगरकर’ लवकरच रंगमंचावर
मराठी रंगभूमीवर मोठा काळ गाजवणाऱ्या जुन्या नाटकांच्या नव्या आणि भव्य रूपातील मांडणीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळू लागल्याने नाटय़ निर्माते, दिग्दर्शकांनी हे ‘यशाचे प्रयोग’ चालू ठेवले आहेत. ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’, ‘आमच्या हिचं प्रकरण’, ‘चल तुझी सीट पक्की’, ‘साखर खाल्लेला माणूस’ यांसारखी नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाटके नाटय़गृहांत गर्दी खेचत आहेत. याच धर्तीवर आता ‘टिळक आणि आगरकर’ हे ७०चे दशक गाजवणारे नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे.
‘अलबत्या गलबत्या’, ‘नटसम्राट’, ‘हॅम्लेट’, ‘आरण्यक’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘ती फुलराणी’, ‘वाजे पाऊल अपुले’ ही एक काळ गाजवलेली नाटके मराठी रंगभूमीवर पुन्हा सुवर्णकाळ घेऊन येत आहेत. जुन्या नाटकांची संहिता न बदलता वा त्यात थोडेफार बदल करून भव्य नेपथ्याच्या आधारे ही नाटके रंगमंचावर सादर केली जात आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने विविध ठिकाणी होणाऱ्या पुलोत्सवात ‘एक झुंज वाऱ्याशी’सारख्या नाटय़कृती सादर केल्या जात आहेत. पृथ्वी थिएटरला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतेच ‘दीवार’सारख्या जुन्या नाटकांचे नव्याने सादरीकरण करण्यात आले.
आता मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ज्येष्ठ नाटककार विश्राम बेडेकर यांची ‘टिळक आणि आगरकर’ आणि ‘वाजे पाऊल आपुले’ ही नाटके लवकरच सादर केली जाणार आहेत. या दोन्ही नाटकांनी अनुक्रमे १९६७ आणि १९८० चा काळ गाजवला होता. बेडेकर यांच्या लोकप्रिय नाटकांची गोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चाखता यावी यासाठी या नाटकांची पुनर्निर्मिती करण्यात येणार असल्याचे साहित्य संघाकडून सांगण्यात आले.
‘त्या-त्या काळाला साजेसे लेखन’
विश्राम बेडेकर लिखित तीन अंकी नाटक ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक पहिल्यांदा अभिवाचनाच्या स्वरूपात रंगमंचावर सादर केले जाणार आहे. कौस्तुभ सावरकर हे नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘‘मार्च, एप्रिलमध्ये या नाटकाचे प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केले जातील आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून व्यावसायिक रंगभूमीवर जास्तीत जास्त प्रयोग केले जातील,’’ असे ते म्हणाले. ‘‘हे नाटक २ अंकांत सादर केले जाणार असून ते यशोदाबाई आगरकरांच्या दृष्टिकोनातून उलगडणार आहे. प्रत्येक दृश्यावर यशोदाबाईंच्या दृष्टिकोनातून भाष्य असणार आहे,’’ असे ते म्हणाले.
नाटक ही शाश्वत कला आहे. लेखकांकडून त्या त्या काळाला साजेसे लेखन झाले आहे. त्यामुळे नाटय़लेखन नवे-जुने असे काही नसते. – कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक, ‘टिळक आणि आगरकर’