बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे प्रमाण नगण्य!

केंद्रीय रस्ता सुरक्षा समितीकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, दंडात्मक कारवाईबरोबर परवाना निलंबित करण्याच्या सूचना
वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानंतर संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यात येतो. वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारचे प्रस्ताव पाठविण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने नवी दिल्लीतील उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
देशभरातील वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांवर फक्त दंडात्मक कारवाई करतात. यापुढील काळात दंडात्मक कारवाईबरोबरच बेशिस्त वाहनचालकांचा परवानादेखील निलंबित करा, अशा स्पष्ट सूचना उच्चस्तरीय सुरक्षा समितीकडून देशभरातील पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
अपघाती मृत्यूचे वाढते प्रमाण तसेच नियम धुडकावण्याच्या वाहनचालकांच्या प्रवृत्तीला वेसण घालण्यासाठी केंद्रीय रस्ता सुरक्षा समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले.
नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून देशातील सर्व राज्यांना रस्ते अपघात तसेच सुरक्षिततेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येतात.





