बेशिस्त पीएमपी, एसटीही कचाट्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/01/PMPML-BUS.jpg)
- वाहतूक पोलीस फॉर्मात : रिक्षांवर धडक कारवाई
पुणे – वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांमुळे कोंडी होऊन अपघात घडतात. यामुळे टीकेचे धनी बनलेल्या वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांवर धडक कारवाई सुरू केली आहे. यातून आता पीएमपी बसेस आणि एसटी महामंडळाच्या बसेसवरही दंड ठोठावण्यात आला आहे.
सोमवारी स्वारगेट येथील मुख्य चौकात 4 पीएमपी बसेस, 1 एसटी, 30 ऑटो रिक्षा आणि जवळपास 40 दुचाकींवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. वाहतूक कोंडी होण्यास बेशिस्त वाहनचालक जबाबदार असून वाहतूक पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. सोमवारी स्वारगेट येथील मुख्य चौकात वाहतूक विभागाने धडक कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांना दंड आकारण्यात आला. मुख्य चौकात ब्रेकडाऊन झालेल्या पीएमपीच्या 2 बसेसचा वाहनांना अडथळा होत असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला. तर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या दोन पीएमपीवर कारवाई करण्यात आली.
बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होते. अशा बेशिस्तांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहनचालकांनी नियमांत वाहन चालवणे गरजेचे आहे. या परिसरात काही भागात खड्डे असून त्यांची दुरुस्ती गरजेचे आहे.
– संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग स्वारगेट