बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
![Meeting of Ajit Pawar and Shivendra Raje in Baramati; Discussions abound in political circles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/अजित-पवार-आणि-शिवेंद्रराजें.gif)
बारामती – भाजपाचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही भेट पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील कामानिमित्त अजितदादांना भेटायला आलो होतो. बाकी काहीही विषय नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातील ऐतिहासिक सभेनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवले होते.