फडणवीस पती-पत्नीमुळे भाजप सत्तेतून बाहेर, दोघांना आवर घाला – शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bjp-sena.jpg)
मुंबई | महाईन्यूज
भाजप सत्तेतून पायउतार होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत टिका केली होती. मध्यंतरी त्यांच्यातील वाद काही प्रमाणात मिटलेला असताना आता पुन्हा मिसेस मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली. त्यावरून शिवसेनेने अमृता फडणवीस यांना आवर घालण्याचे पत्र संघाला पाठविले आहे.
अमृता फडणवीस यांचा राजकीय हस्तक्षेप वाढला असून त्यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे.
किशोर तिवारी यांची तक्रार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवर घालावा. देवेंद्र आणि अमृता फडणवीस या दोघांकडून जी टीका केली जात आहे. त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहे, ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपाला सरकार बाहेर जावं लागलं, हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झालं, असा ठपका ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला असून अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे अशोभनीय आहे.
ही बाब म्हणजे भारतीय संस्कृतीतील पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणारं आहे. अमृता फडणवीस यांना भाजपा हा पक्ष टेक ओव्हर करायचा आहे का ?. अमित शाह, नितीन गडकरी यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं ऐकिवात नाही जे काही करायचं ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केलं. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं. हे मुद्दे या पत्रात मांडल्याची माहिती समोर आली आहे.
अमृता फडणवीस यांचे विधान
“कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्याची मजा कधीच कळत नाही. आदित्य ठाकरे… तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे, तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं. याच ट्विटवरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी संघाला पत्र लिहून अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना आवरा अशी मागणी केली आहे.