फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक स्थिती उध्वस्त केली – शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/sharad-Pawar.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम केलं. त्याची सखोल चौकशी करावी, खरी वस्तुस्थितीत लोकांच्या समोर मांडण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी देशातील सध्यस्थिती, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीबाबत आपले मत व्यक्त केले. सध्या देशात वेगळं चित्र आहे, गंभीर विषयांवरून नागरिकांचं लक्ष हटवण्यात येत आहे. CAA, NRC कायद्यावरुन सुरु असलेल्या राड्याबाबत चिंताग्रस्त परिस्थिती आहे, असे शरद पवार म्हणाले.
भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा विरोध आहे. आम्ही संसदेत कायद्याच्या विरोधात मतदान केलं. यामुळे देशाच्या गंभीर प्रश्नांवरुन जनतेचं लक्ष बाजूला जात आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तान या तीन देशांच्याच विशिष्ट धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देऊ केलं आहे. याशिवाय, नवे लोक भारतात येत आहेत. बाहेरुन आलेल्या लोकांचं धोरण ठरवताना श्रीलंकेतून येणाऱ्या तामिळ लोकांचा विचार करण्यात आलेला नाही. कारण ते एका विशिष्ठ धर्माचे लोक नाहीत, अशी शंका येते, असं पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, माझ्याकडे 30 वर्षांपासून नेपाळी लोक राहतात. माझ्याकडेच नाही, तर अनेक लोकांकडे घरं सांभाळण्याचे काम ते करत आहेत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठीच ही योजना होती तर मग नेपाळसह इतर देशांचा विचार का केला नाही. यातून राज्यकर्ते राष्ट्राच्या ऐक्याला धोका आहे. देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. याकडून लक्ष विचलित करण्यासाठीच हे केलं जात आहे. महाराष्ट्रातून इतका संताप व्यक्त होईल असं वाटलं नव्हतं. मात्र, येथूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. विनाकारण ही परिस्थिती तयार केली जात आहे. जवळपास 8 राज्यांनी आम्ही हा कायदा लागू करणार नाही असं म्हटलं आहे. 8 वं राज्य बिहार आहे. तेथे भाजप सत्तेत आहे.
फडणवीस सरकारने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त केली
भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात जी विकासकामं केली. त्यावर कॅगने अहवाल दिला आहे. जवळपास 66 हजार कोटी रुपयांच्या कामांबाबत कॅगने ठपका ठेवला आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती फडणवीस सरकारने उद्ध्वस्त केली. आघाडी सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि वस्तूस्थिती जनतेसमोर मांडण्याची मी मागणी करतो.