breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्रेमास नकार देणाऱ्या युवतीवर हल्ला करणाऱ्यास पकडले

सिंहगड रस्ता भागातील घटना

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या युवतीचा पाठलाग करून तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील नांदेड फाटा परिसरात मंगळवारी रात्री घडली. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पसार झालेल्या एकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

या घटनेत जखमी झालेली युवती कात्रज भागातील आहे. तिच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी लक्ष्मण तुकाराम धावडे (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. युवतीने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार युवतीचे धायरी भागात ब्युटी पार्लर आहे. तिचे आणि धावडेचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. धावडेचा वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान, युवतीने विवाहित असलेल्या धावडेशी प्रेमसंबंध तोडल्यानंतर तो तिच्यावर चिडून होता. धावडेने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. वर्षभरापूर्वी त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता.

तक्रारदार युवती मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास धायरीतील बारांगणी मळा परिसरातून दुचाकीवरून जात होती. तिच्या मागावर असलेल्या धावडेने मोटार दुचाकीला आडवी घातली. युवतीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. युवतीने आरडाओरडा केला. त्यानंतर धावडे मोटारीतून पसार झाला. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर धावडे किरकिटवाडी भागात गेला. तेथून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर तो गेला. धावडे किरकिटवाडी भागात लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष सावंत यांना ही माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ननावरे, सावंत, रफिक नदाफ, नीलेश जमदाडे, गोसावी, पडवळ आदींनी धावडेला किरकिटवाडी भागातून ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button