breaking-newsमहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर-रामदास आठवले गटातील वाद भडकणार

मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाद भडकण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या सभेत आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख”चोर” असा केल्यानंतर आंबेडकर समर्थकांनी आठवलेंची सभाच उधळून लावली. आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणार्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २५ व्या नामविस्तार दिनानिमित्त ‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा सोमवारी झाली. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता सभेला सुरुवात झाली.‘रिपाइं’चे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी आपल्या भाषणात आठवले यांनी नामांतर लढ्यात केलेल्या परिश्रमावर भाष्य केले. तसेच लढ्यात योगदान नसलेल्या नेत्यांना आठवले यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष संजय ठोकळ यांनी भाषणातून  पाच प्रश्न विचारले. या भाषणानंतर सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी पुन्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका सुरू केली. ‘नातू म्हणवून घेणारे हे चोर’ असे शेळके यांनी म्हणताच सभेतील लोक उभे राहून घोषणाबाजी करू लागले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक सुरू केल्यामुळे काही वेळातच सभा गुंडाळण्यात आली. ‘कोणत्याही नेत्यावर टीका करण्याचा हा दिवस नाही. टीका करताना आमच्या नेत्यांनीही भान ठेवले पाहिजे’ असे भाषणात म्हणत आठवले यांनी वादावर पडदा टाकला होता.

मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ  यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आंबेडकरी जनता आहे. प्रकाश आंबेडकर हे जरी बाबासाहेबांचे नातू असले तरी त्यांची समाजात वेगळी ओळख आहे. त्यांनी समाजासाठी आयुष्य झिजवले आहे. ते समाजासाठी राजकीय तडजोड करत नाहीत. शेळके हा खुप मोठा नेता नाही. त्याची टीका करायची लायकी नाही. आंबेडकरांबद्दल कुणी अपशब्द वापरला तर त्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही. समाज रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंसोबत नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. आठवलेंना त्यांची जागा त्यांच्या १० फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणा-या सभेत दिसून येईल, असे भुईगळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button