पोलीस भरती नियमावलीतील बदलास विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-25-5.jpg)
भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संतप्त प्रतिक्रिया
पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतल्यानंतर भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवार युवक-युवतींनी संताप व्यक्त केला आहे. नियमावलीत बदल केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी उमेदवारांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारांच्या भावना मांडण्यात येतील तसेच निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन सुळे यांनी दिले.
सारसबाग येथील कै. बाबुराव सणस मैदानावर दररोज सकाळी पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक आणि युवती सरावासाठी जमतात. गृहखात्याकडून पोलीस भरती प्रक्रियेत दोन दिवसांपूर्वी बदल करण्यात आले आहेत. शारीरिक चाचणीला ५० आणि बौद्धिक चाचणीला १०० गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खासदार सुळे यांनी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींची सणस मैदानावर भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सुळे यांनी या वेळी त्यांच्याशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, याबाबत मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. उमेदवारांच्या भावना त्यांच्यापुढे मांडणार आहे. पोलीस भरती प्रक्रिया बदलण्यास काही हरकत नाही. मात्र, ऐनवेळी केलेल्या बदलांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच ठेवावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. उमेदवारांनी नाउमेद होऊ नये. बौद्धिक चाचणी तसेच मैदानी सरावावर लक्ष केंद्रित करावे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर भरती झाली होती. त्या वेळी भरती प्रक्रियेत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.
सरकार असंवदेनशील आहे.भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना समाजमाध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन सुळे यांनी या वेळी केले.