पोलिसांच्या उडवाउडवीचा निवृत्त पोलिसाला फटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-red-theme-4.jpg)
मुंबई : गुन्हा नोंदवून घेण्यात पोलिसांकडून कशी टाळाटाळ केली जाते, याचा अनुभव नागरिकांना अनेकदा येत असतो. मात्र, पोलिसांच्या उडवाउडवीच्या ‘चक्रव्युहा’तून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचीही सुटका होऊ शकलेली नाही. घर खरेदीसाठीची ४० टक्के रक्कम भरूनदेखील १५ वर्षांपासून घराचा ताबा न देणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी या माजी निरीक्षकाला तब्बल तीन वर्षे पोलीस ठाण्यात हेलपाटे घालावे लागले. अखेर गेल्या महिन्यात त्यांची तक्रार दाखल करून घेत विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून २०१०मध्ये निवृत्त झालेले गनी मुजावर (६६) यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात नेमणूक असताना २००५मध्ये याच भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर खरेदीचा निर्णय घेतला. १२ लाखांच्या एकूण रकमेपैकी पाच लाख रुपये त्यांनी विकासकाला सुपूर्दही केले. मात्र, आजतागायत त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. विक्रीकिमतीच्या ४० टक्के रक्कम अदा केल्यानंतर विकासकाकडून घरनोंदणी करार होणे आवश्यक होते. मात्र, विकासकाने ‘आज करू, उद्या करू’ असे सांगत मुजावर यांना झुलवत ठेवले. तर ते पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर त्याने सरळ हात वर करण्यास सुरुवात केली.