पेण विधानसभेत भाजपला धक्का, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/BJP-Pen-Raigad.jpg)
रायगड | महाईन्यूज |
भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढताना दिसत आहे. बंडखोरी शमवण्याचं आव्हान असतानाच आता पदाधिकारी पक्षांतर करत असल्याचं दिसत आहे. भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी अनेक कार्यकर्त्यांसह आज (दि. 13 ऑक्टोबर) शेतकरी कामगार पक्षामध्ये (शेकाप) प्रवेश केला.
शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश झाला. राऊत यांच्या पक्षांतरामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा निवडणुकीच्या निकालावरही किती परिणाम होणार हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. भाजपचे पेण-पाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री रवी पाटील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे पेण-सुधागड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत याचा थेट फटका रवी पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या रवी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी बंडाची भाषा सुरु केली आहे.