पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं ; गोंदिया आणि मनमाडमध्ये नव्वदी पार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/petrol-price759-1.jpg)
नागपूर – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण असताना शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 25 पैशांनी महागलं आहे. दर वाढल्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 89.01 रुपये झाला असून, डिझेलचा दर 78.07 रुपये प्रतिलिटर झाला आहे. विशेष म्हणजे गोंदिया आणि मनमाडमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे.
दिल्लीत पेट्रोल 35 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महाग झालं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 89.01 रुपये तर डिझेलचा दर 78.07 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. बुधवारी इंधन दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. गुरुवारी पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी महागले होते, तर शुक्रवारी पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले. सलग १७ दिवस वाढ झाल्यावर फक्त बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेससह सगळ्याच विरोधकांनी भारत बंद पुकारला होता. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशीही मागणी केली होती. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला महागाईच्या अंधारात ढकलले आहे अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.