पुणे विभागात 170 गावांना 175 टॅंकरने पाणी पुरवठा सुरू!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/water_tanker.jpg)
पुणे – उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने पुणे विभागातील टंचाईग्रस्त गावाची संख्या वाढत आहे. आजअखेर पुणे विभागातील 170 गावांतील 1 हजार 127 वाडी-वस्त्यांवर 3 लाख 63 हजार 412 नागरिकांना 175 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एका आठवड्यामध्ये टॅंकरची संख्या 35 नी वाढली आहे.
ेगेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यामुळे सिमेंटच्या बंधाऱ्यांत चांगले पाणी साठले होते. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये टंचाईग्रस्त गावामध्ये टॅंकर सुरू होतात. मात्र, यंदा जलयुक्त शिवारच्या कामामुळे मार्चपासून टॅंकरला सुरवात झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने टॅंकर सुरू केले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर-10, आंबेगाव-5 आणि बारामती-4 असे 19 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण-33, कोरेगाव-1, वाई-1, पाटण- 2, जावळी- 5 आणि महाबळेश्वरमध्ये 1 टॅंकर सुरू आहे. सांगलीत जत-57, तासगाव-14, कवंठे महांकळ-10, आटपाडी-16, शिराळा-1 आणि खानापूर भागामध्ये 15 टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 119 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने पाण्याच्या समस्यावर मात करण्यासाठी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार नळपाणी पुरवठा योजनाची दुरूस्ती, विंधन विहिरी घेणे, हातपंप दूरूस्त करणे, तलावामध्ये पाणी सोडणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील 11 गावांतील 101 वाडी-वस्त्यांवर 35 हजार 860 नागरिकांना 19 टॅंकर, सातारा जिल्ह्यातील 45 गावांतील 257 वाड्यावस्त्यांतील 54 हजार 804 नागरिकांना 43 टॅंकर आणि सांगली जिल्ह्यातील 114 गावांतील 769 वाडी-वस्त्यावरील 2 लाख 72 हजार 748 नागरिकांना 113 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.