पुणे बलात्कार व हत्याप्रकरण: नराधम काकाने केली पुतणीची हत्या ?
![Accused of raping and killing a 3-year-old girl at Pen in Raigad arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rape-1-1.jpg)
पुण्यातील धायरी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच हे क्रूरकृत्य केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सिंहगड रस्ता भागात असलेल्या धायरीतील गारमाळ परिसरात गुरुवारी अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली होती. ससून रुग्णालयात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
पीडित मुलगी १७ वर्षांची असून तिचे आई- वडील मजुरी करतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. यानंतर ती घरात एकटीच होती. संध्याकाळी साडेपाचच्या ते कामावरुन घरी परतले असता पीडित मुलगी घरात बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.
ससून रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार केल्याचेही उघड झाले. यानुसार सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासात पीडित मुलीच्या मावशीचा पती पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानेच पुतणीवर बलात्कार केला आणि मग तिची हत्या केली, असा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.