“पीएमआरडीए’ रिंगरोडसाठी लवकरच भूसंपादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pmrda-1-.-1.jpg)
- जिल्हाधिकारी राम : पहिल्या टप्प्यासाठी 120 हेक्टर जागेची गरज
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा “रिंग’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आंबेगाव ते वाघोली या 33 किमी लांबीचा रिंगरोड विकसित केला जाणार आहे. यातील 12 किमीसाठी 120 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. हे भूसंपादन करण्यासाठीचा प्रस्ताव लवकर “पीएमआरडीए’ कडून जिल्हा प्रशासनाकडे येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी “पीएमआरडीए’ने रिंग रोड करण्याचा निर्णय घेतला आहे. “पीएमआरडीए’च्या एकूण रिंगरोडची लांबी ही 128 किलोमीटर आहे. तर रुंदी 110 मीटर आहे. पहिल्या टप्प्यात पुणे सातारा महामार्ग ते पुणे नगर महामार्ग यांना जोडणारा आंबेगाव खुर्द ते वाघोली असा 33 किमी लांबीचा रिंगरोड करण्यात येणार आहे. या रिंगरोडसाठी मान्यतेची प्रक्रियाही “पीएमआरडीए’ने पूर्ण केली आहे. या रिंगरोडसाठी 1,430 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यापैकी 1,275 हेक्टर जागा ही खासगी मालकीची आहे. उर्वरित जागा सरकारी आणि वनविभागाच्या मालकीची आहे. ही जागा संपादित करण्यासाठी सुमारे 13 हजार 594 कोटी रुपयांची गरज आहे. तर रस्त्याच्या बांधकामासाठी 10 हजार 234 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
रिंगरोडसाठी टीपी स्कीम (नगररचना योजना) हे मॉडेल राबविले जात आहे. टीपी स्कीममधून रिंगरोडसाठीची जागा उपलब्ध होणार आहे. तसेच रिंगरोडसाठीच्या काही जागा “पीएमआरडीए’च्या यापूर्वीच ताब्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागा या भूसंपादन करून ताब्यात घेतल्या जाणार आहे.
रिंगरोडसाठी किती गावातील किती भूसंपादन करावे लागणार आहे, शिवाय याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीसाठी पहिल्या टप्प्याच्या 12 किमीच्या रिंगरोडसाठी 120 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. याचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून लवकरच जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.