पराभवानंतर तरी भाजपनं खऱ्या अर्थानं… रोहित पवारांनी दिला भाजपला खोचक सल्ला
![Even after the defeat, BJP in the true sense ... Rohit Pawar gave strong advice to BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rohit-Pawar-1.jpg)
मुंबई: ‘भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आलेली आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली, असा टोला देखील रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला लगावलेला आहे.
विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली असून भाजपचा धुव्वा उडवला आहे. रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीकेची तोफ दागलेली आहे. भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत येथे महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आतातरी भाजपनं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिक काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी खोचक सल्ला देखील दिलेला आहे.
आवश्य वाचा- पुण्यात भाजपाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी