नागरिकांना एकाचवेळी 3 महिन्याचं धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने मागे घेतला
नागरिकांना एकाचवेळी तीन महिन्याचं धान्य देण्याचा घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने मागे घेतला आहे…लोकांना तीन महिन्याचं धान्य आधीच दिलं तर लोक हे धान्य विकतील या भीतीमुळे सरकारने तसेच जे लोक तीन महिन्याचे धान्य आधीच घेऊन गेले आहेत, त्यांना पुढील दोन महिने धान्य न देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे …. शासनाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही लोक रस्त्यावर दिसत असल्याने गर्दी टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून रेशन दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना तीन महिन्याचं धान्य एकावेळी देण्याचा निर्णय घेतला होता. १९ मार्च रोजी तसं परिपत्रकही काढण्यात आलं होतं. त्यात राज्यातील नागरिकांना तीन महिन्याचं धान्य एकावेळी देण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच तीन महिन्याचं धान्य एकाचवेळी देण्याच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले होते. मात्र, शासनाने आता नवे परिपत्रक काढले असून राज्यातील जनतेला तीन महिन्याचे अन्नधान्य एकावेळी न देण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक महिन्याला नागरिकांना अन्नधान्य देण्यात यावेत, असे आदेशच शासनाने दिले आहेत. तीन महिन्याचे धान्य घेऊन लोक हे धान्य विकतील अशी भीती वाटल्याने शासनाने आधीचा निर्णय मागे घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं…एवढच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून गरीबांना तीन महिन्याचं धान्य आधीच देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे…
आतापर्यंत १० टक्के लोकांनी एकावेळी तीन महिन्याचे धान्य नेलेले आहे. त्यांना पुढील दोन महिने धान्य न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जे लोक तीन महिन्याचे धान्य अगाऊ घेऊन गेले, त्यांना आता धान्य मिळणार नाही. तसेच आता नागरिकांना प्रत्येक महिन्यालाच धान्य मिळणार आहे. याव्यतिरिक्त प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ) मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.